पिंपरीतील संपूर्ण बाजारपेठ रविवारपर्यंत बंद; आयुक्तांचे आदेश

पिंपरी – लॉकडाऊन 4 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर नॉन रेडझोनमध्ये आल्यामुळे शिथिलता देण्यात आली होती. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांत बाजारपेठांसह अनेक ठिकाणी झालेल्या मोठ्या गर्दीमुळे करोनाचा शहरात उद्रेक झाला आहे. हा उद्रेक रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरीतील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही बाजारपेठ रविवार (दि. 31) मेपर्यंत बंद राहणार आहे.

याबाबत श्रावण हर्डीकर यांनी मंगळवार (दि. 26) मे रोजी रात्री उशिरा आदेश जारी केले आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार, काही अटी व शर्तींवर बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र परवानगी दिल्यानंतर प्रशासनाने घातलेल्या अटींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या शिवाय सामाजिक अंतराचे पालन न करणे, मास्क न वापरणे, सम-विषय तारखेला दुकाने चालू करण्याच्या नियमांचे उल्लंघन करणे, बंदी असतानाही अनेक नागरिकांनी एकत्र जमणे यांसह अनेक अटींचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे शहरात करोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्प, शगुन चौक, कराची चौक, आर्य समाज चौक, साई चौक, गेलॉर्ड चौक, रमाबाई आंबेडकर चौक, डिलक्‍स चौक, संत गाडगे महाराज चौक व या परिसरातील सर्व दुकाने 31 मेपर्यंत बंद करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे पिंपरी कॅम्पासह परिसरातील सर्व दुकाने रविवारपर्यंत बंद राहणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.