मुझफ्फरपूर – देशभरातील स्थलांतरितांच्या अतिशय क्लेषदायक अवस्थांच्या बातम्या दिसत असताना, अशीच एक घटना बुधवारी बिहारमधील मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकावर बघायला मिळाली. अत्यंत हालाखीचा प्रवास, उपासमार, पायपीट आणि उन्हातान्हाचे चटके सोसत एका महिलेने अखेर प्लॅटफॉर्मवरच जीव सोडला. मात्र तिच्या मृतदेहाजवळच असलेल्या तिच्या लहानग्या बाळाला मृत्यू हे सत्य अजून माहितीच नसावे. आपली आई प्लॅटफॉर्मवरच झोपली आहे, असे समजून हे बालक आपल्या मातेला जागे करण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होते.
या महिलेच्या अंगावर पांघरलेले ब्लॅंकेट वारंवार उचलून ते जणू आपल्या आईला जागे होण्यास विनवणी करत होते. आजूबाजूला स्थलांतरित मजुरांची गर्दी, रेल्वे स्थानकावरील गदारोळ, रेल्वेगाड्यांच्या अनाउन्समेंट आणि प्रवाशांच्या धावपळीमध्येच या बालकाचा हा प्रयत्न सुरू होता. मात्र त्याला त्याच्या मृत आईकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
या घटनेचा व्हिडिओ राजद नेते तेजस्वी यादव यांचे सहकारी संजय यादव यांनी चित्रीत केला आणि ट्विटरवर पोस्ट केला. स्थलांतरित मजुरांचा अशाप्रकारे अंत होण्यास कोण जबाबदार आहे ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
या घटनेबाबत मुझफ्फरपूर रेल्वे पोलिसांचे उपाधीक्षक रमाकांत उपाध्याय यांनी माहिती दिली.
अहमदाबादवरून श्रमिक विशेष रेल्वेने मुझफ्फरपूरला जात असताना 25 मे रोजी प्रवासादरम्यानच या महिलेचा अंत झाला. या महिलेसह तिची बहीण आणि मेव्हणेही होते. मधुबनीला जाणाऱ्या रेल्वेमध्येच या महिलेचा मृत्यू झाला होता. या स्थलांतरित मजुरांना प्रवासादरम्यान अन्न आणि पाण्याची समस्या नव्हती, असे या महिलेच्या मेव्हण्याने सांगितले. या महिलेच्या मृत्यूबाबत समजताच पोलिसांनी मृतदेह उचलून प्लॅटफॉर्मवर ठेवला आणि नंतर शवविच्छेदनासाठी पाठवून दिल्याचेही त्याने सांगितले.
ही महिला 35 वर्षाची होती आणि काही आजारपणामुळे अहमदाबादेत तिच्यावर उपचारही सुरू होते. तिला मानसिक आजारही होते, असेही तिच्या मेव्हण्याने सांगितले. मात्र तिच्या अचानक मृत्यूचे नेमके कारण त्याला सांगता येईना. हे कारण डॉक्टरच सांगू शकतील, असे तो म्हणाला.
देशाची फाळणी झाली होती, तेंव्हा जसे निर्वासितांचे लोंढे येत होते. तसेच आताही देशाच्या विविध भागांमधून आपापल्या मूळ गावी येऊ लागले आहेत. शेकडो किलोमीटरच्या प्रवासादरम्यान अशा दुःखद घटना वारंवार दिसत आहेत. मात्र या निर्वासितांच्या वेदना काही संपत नाही आहेत. प्लॅटफॉर्मवरील बालकाला त्याची आई मिळू शकणार नाही.