सणबूर -लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहिर झाली होता. उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आ. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली स्व. शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलमधून 17 जागांसाठी 30 अर्ज दाखल झाले होते. सोमवार, दि. 27 रोजी उमेदवारी अर्जांच्या छानणीमध्ये दाखल झालेले सर्व अर्ज वैध झाले होते. तर दि.28 व 29 जून या अर्ज माघार घेण्याच्या पहिल्या दोन दिवशी 11 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 17 जागांसाठी 17 अर्ज शिल्लक राहिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
दरम्यान, आ. शंभूराज शिवाजीराव देसाई, यशराज शंभूराज देसाई, अशोकराव अनंत पाटील, सोमनाथ हिंदुराव खामकर, प्रशांत व्यंकटराव पाटील, शशिकांत मोहनराव निकम, सर्जेराव लक्ष्मण जाधव, पांडुरंग आण्णासो नलवडे, प्रशांत राजाराम पाटील, सुनील शिवराम पानस्कर, बळीराम शंकर साळुंखे, महिला राखीवमधून दिपाली विश्वास पाटील, जयश्री रामचंद्र कवर तर अनुसुचित जाती जमाती गटातून विजय मधुकर सरगडे, इतर मागासवर्गीय जागेसाठी शंकरराव गणपतराव पाटील, विमुक्त जाती-भटक्या जमातीमधून एका जागेसाठी भागुजी विठ्ठल शेळके तर सहकारी संस्था गटातून डॉ. दिलीपराव बापूराव चव्हाण या उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत.
त्यामुळे आता 17 जागांसाठी फक्त 17 उमेदवारी अर्ज राहिले असल्याने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख आ. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होत असून केवळ आता औपचारिकता बाकी राहिली आहे.दि. 12 जुलै रोजी निवडणुकीचे अर्ज माघारीचे शेवटच्या दिवशी कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहिर होणार आहे.
विश्वास सार्थ ठरविणार : यशराज देसाई
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद यांच्या हिताचे निर्णय घेऊन कारखान्याचे कामकाज चांगल्या प्रकारे पुढे चालविण्याचा मानस आहे. कारखाना निवडणूक प्रथमच बिनविरोध करत कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद यांनी कै. शिवाजीराव देसाई शेतकरी पॅनेलवर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगत अल्पावधीतच कारखान्यामध्ये आमुलाग्र बदल करुन ऊस उत्पादक सभासद शेतकरी व अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे युवा नेते यशराज देसाई यांनी यावेळी सांगितले.