पनवेल – मुंबई गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी शिवशाही बस पलटल्याने एकाचा मृत्यू झाला असून तब्बल 22 जण जखमी झाले आहेत. कर्नाळा खिंडीतील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजकाला धडकली. याबसमधून 40 जण प्रवास करत होते. मंगळवारी रात्री 3.30 च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती आहे.
दिप्तेश मोरेश्वर टेमघर असे अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. जखमी प्रवाशांवर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेलहून महाडकडे भरधाव वेगात शिवशाही बस निघाली होती.
मात्र, कर्नाळा खिंडीत आल्यानंतर या बसला अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना दोन रुग्णवाहिकांमधून पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघातातील जखमी प्रवाशांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली आहे.