दंतेवाडा ( Naxalites attack in Dantewada in Chhattisgarh ) – छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जिल्हा राखीव रक्षक दलाचे(डीआरजी) 10 पोलिस व 1 वाहन चालक शहीद झाले आहेत. गुप्तचर माहितीनंतर सुरू करण्यात आलेल्या माओवादीविरोधी मोहिमेतून ही पोलिसांची तुकडी परतत होती. त्या दरम्यान डांबरी रस्त्याच्या मधोमध “आयईडी’चा स्फोट घडल्याने या मोठाव खड्डा पडल्याचेही समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे.
जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) विशेष दलामध्ये माओवाद्यांशी लढण्यासाठी प्रशिक्षित स्थानिक आदिवासींचा समावेश असतो. ही घटना अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याचीही माहिती मिळाली आहे. हल्ल्याचे ठिकाण राज्याची राजधानी रायपूरपासून सुमारे 450 किमी अंतरावर आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली आहे.
“दंतेवाडा येथे छत्तीसगड पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे आपण व्यथित झालो आहोत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांशी बोलून राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. शहीद जवानांच्या शोकाकुल कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहे,’ असे ट्विट शहा यांनी केले आहे.
या गाडीत 25 ते 30 जवान होते असे सांगण्यात येत आहे. जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात आणण्यासाठी चार रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली असून एसपीही घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेला दुजोरा देत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे.
शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त करताना, हा लढा शेवटच्या टप्प्यात असून नक्षलवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद संपवू, असेही त्यांनी म्हटले आहे.