पाचगणी (प्रतिनिधी) – बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे पसरणी घाटात झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यु झाला. पुण्याहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या बसचा अचानक ब्रेक फेल होऊन पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराजवळ अपघात झाला.
अवघड वळणावर ब्रेक फेल झाला असताना याच बसच्या पाठीमागे पाचगणीच्या दिशेने एक दुचाकीस्वार एका महिलेसह चालला होता. बस पाठीमागे येत असताना बसच्या चालकाने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, बस बाजूच्या कठड्याला धडकली.
महिला व दुचाकीस्वार बसच्या खाली अडकले गेले. बस कठड्याला अडकली नसती तर कदाचित बस देखील 400 ते 500 फूट खोल दरीत कोसळली असती. बस मध्ये साधारणतः 20 ते 25 लोक प्रवास करत असल्याचे समजले. या अपघातातील महिलेला व पुरुषाला तात्काळ खासगी वाहनाने दवाखान्यात हलवण्यात आले. त्यात महिलेचा मृत्यु झाला.
मृत झालेली महिला पाचगणी येथील असून प्रीती योगेश बोधे (वय ४०)असे तिचे नाव आहे. खंडाळा आगाराची ही बस ( एमएच ०६ एस ८०५४) महाबळेश्वरकडे मुक्कामासाठी जात होती. प्रा. प्रीती बोधे या दुचाकीवरुन ( एमएच ११ एयू ६०६७) जाताना दुर्घटना झाली. पाचगणीतील बोधे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.