पाऊस होऊनही शेतकऱ्यांची निराशाच

सुपा – पारनेर तालुक्‍यातील सुपा जिरायती पट्ट्यात चालू वर्षी पावसाने चांगली हजेरी लावली. मात्र शेतकऱ्यांची झोळी खराब हवामानामुळे रिकामीच राहणार आहे.

गतवर्षी खरिप हंगाम वाया गेला. उशिरा का होईना परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. नदी-नाले ओसंडून वाहू लागले. बळीराजाची रब्बी हंगामासाठी लगबग सुरू झाली. शेतात असलेल्या मुगाला पाळ्या घातल्या व रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, सोयाबीन, कापूस, तूर, मका, वाटाणा, गहू आदींची पेरणी करण्यात आली. पाणी मुबलक असल्याने जणावरांसाठी घासाचे बी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आले.

ऑक्‍टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने ज्वारी, सोयाबीन, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातूनही सावरत असतानाच बळीराजा वातावरणाशी मोठा संघर्ष करताना दिसत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांना पोषक असे वातावरण नसल्याने या पिकावर रोगराईचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याने महागडे औषधे विकत घेऊन फवारण्या कराव्या लागत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. जानेवारी महिना निम्मा सरला असताना देखील रब्बी हंगामातील पिकांना पोषक असणारी थंडी अद्याप सुटली नसल्याने व पिकांना पोषक वातावरण मिळत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. ज्वारी निसवून एका महिन्याचा कालावधी लोटला असतानाही अद्याप ज्वारीला दाणे भरत नाही.

रोजच्या ढगाळ वातावरण व धुक्‍यामुळे ज्वारी, हरभरा, गहू या पिकांना माव्यासह चिकटा या रोगाने ग्रासले आहे. मका, तुरीवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला आहे.तालुक्‍यातील सुपा परिसर कांद्याचे आगर मानले जाते. कांद्याला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने सुपा, वाळवणे, आपधूप, वाघुंडे, हंगा, मुंगशी, म्हसणे, घाणेगाव, बाबुर्डी, रुईछत्रपती, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, भोयरे गांगर्डा, कडूस, पळवे, जातेगाव आदी भागात कांद्याची लावगड करण्यात आली आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे हे पीक धोक्‍यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.