रोम – अफगाणिस्तानात सध्या दुष्काळी स्थिती असून त्या देशातील सुमारे 1 कोटी 40 लाख लोकांपुढे भुकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेमार्फत त्यांना अन्न पुरवण्याची तयारी करण्यात आली आहे, पण तालिबान्यांच्या असहकार्यामुळे या लोकांना तेथे अन्नही पुरवता येईनासे झाले आहे, अशी माहिती रोम येथील संयुक्त राष्ट्रांच्या द वर्ल्ड फूड प्रोग्रॅमच्या मुख्यालयातून मिळाली आहे.
त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानची एकूण लोकसंख्या सुमारे तीन कोटी 90 इतकी आहे आणि त्यातील 1 कोटी 40 लाख लोक भुकेच्या चक्रात अडकले आहेत. गेल्याच आठवड्यात उत्तरेकडील एका प्रांताची राजधानी असलेल्या फैजाबादमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथे मदतसाठी पाठवण्यात आलेले अन्नधान्याचे ट्रक लोकांपर्यंत पोहोचू शकले नव्हते.
शेवटी तेथील तालिबान्यांशी कसाबसा संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर हे ट्रक लोकांपर्यंत पोहोचू देण्यात आले आहेत, असे या मुख्यालयातील सूत्रांनी सांगितले. तथापि, कंदहार, हेरात आणि जलालाबाद या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीला अन्न वितरणाची अनुमती अजून तालिबानकडून मिळू शकलेली नाही. अन्नाच्या कमतरतेमुळे अफगाणिस्तानातील सुमारे 20 लाख बालके कुपोषित आहेत, अशी माहितीही संयुक्त राष्ट्रांच्यावतीने देण्यात आली आहे.