श्रीनगर – काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत जैश ए महंमदचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत. नागबिरन त्राल मधील वन विभागात हीं चकमक झाली. हे दहशतवादी तिथे लपून बसले होते. या जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अलीकडच्या काळात झालेली ही दुसरी मोठी चकमक आहे.
ठार झालेले दहशतवादी जैश ए महंमद या संघटनेचे असल्याचे स्पष्ट होत असले तरी त्यांची नावे मात्र अजून समजलेली नाहीत. ते ज्या जंगल परिसरात लपून बसले होते तेथे अन्य दहशतवाद्यांचे वास्तव्य आहे काय याची कसून चौकशी केली जात आहे. त्या जंगल परिसरात त्यांचा अड्डा असावा, असा कयास असून त्याचा शोध घेतला जात आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून आधुनिक रायफली आणि अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.