महाविकास आघाडी सर्वसामान्यांना न्याय देईल

इस्लामपूर – कर्ज कितीही असलेतरी राज्याची प्रगती न थांबवता सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू. कर्जमाफी आणि अन्य प्रश्नांसाठी थोडा वेळ लागेल. आम्हाला थोडा वेळ द्या, शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे सरकार सामान्यांना न्याय मिळवून देईल, असे प्रतिपादन मंत्री जयंत पाटील यांनी केले.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच इस्लामपूरला आल्याने त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. त्यानंतर आयोजित नागरी सत्कार सभेत ते बोलत होते. सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मानसिंग नाईक यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी खासदार राजू शेट्टी, पी. आर. पाटील, प्रा. शामराव पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, माणिकराव पाटील, प्रतिक व राजवर्धन पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेचे राजकारण सुरु केले. राजकारणात बेरजेचे राजकारण फार महत्त्वाचे आहे.आमच्यातील अनेकांनी पक्ष सोडला. आता पुन्हा परत येण्यासाठी फोन करीत आहेत. निवडणुकीनंतर विचित्र हालचाली झाल्या. सकाळी वेगळं, दुपारी आणि रात्री वेगळं अशी विचित्र उलथापालथ अनुभवायला मिळाली. राज्यातील जनतेला आम्ही तिघांनी सत्तेत यावं असं मनापासून वाटत होतं. शरद पवारांनी ते करून दाखवलं. शिवसेनेबरोबर जाताना मागच्या सरकारच्या चुका, अपयश विचारात घेतल्या. यापूर्वी उद्धवजी प्रशासकीय कामात नव्हते. सरळ माणूस म्हणून मी त्यांना अनुभवले आहे. महाराष्ट्राला खरे आणि स्पष्ट बोललेले आवडते. हे नवे व्यक्तिमत्त्व सर्वांना विश्वासात घेऊन राज्याचा गाडा चालवेल.
राज्यात अनेक गंभीर समस्या आहेत.

राज्याच्या डोक्‍यावर 10 लाख 71 हजार कोटींचे कर्ज आहे. शिवाय मेट्रो व अन्य प्रकल्पांचे 2 लाख कोटींचे कर्ज वेगळे. सांगली जिल्ह्यातील प्रश्नांकडे गेल्या पाच वर्षात दुर्लक्ष झाले आहे. दुष्काळ, पाणी प्रश्न, वाकुर्डे योजना व प्रलंबित प्रकल्पांना चालना द्यायची आहे. जिल्ह्याने भाजपला जी संधी दिली, त्याचा उपयोग जिल्ह्याला झाला नाही म्हणून यावेळी चित्र बदलले. महापुराचा आढावा घेतलाय, पडलेली घरे बांधून देऊ. अधिवेशनानंतर ते काम सुरू होईल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात राष्ट्रवादी राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल.

श्रीनिवास पाटील म्हणाले, शरद पवार म्हणतील ते धोरण आणि जयंत पाटील बांधतील तेच तोरण आम्हाला मान्य आहे. महाविकास आघाडीच्या निर्मितीत जयंतरावांचे मोठे योगदान आहे. राजू शेट्टी यांनी योग्यवेळी चांगला निर्णय घेतला. जयंत पाटील यांनी परिवर्तन घडवून आणले. त्यांनी राजारामबापूंची उणीव भरून काढली. मोदींनी ज्यांचे बोट धरले ते आमचे नेते आहेत. त्यांच्या साथीने जयंतरावांनी परिवर्तन केले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जयंतरावांच्या साथीने राज्याचा विकास घडेल.

राजू शेट्टी म्हणाले, सत्ताबदल अनपेक्षित होते. मुख्यमंत्र्यांनी नुसत्या घोषणा केल्या. राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्याला आधाराची गरज आहे. सातबारा कोरा करण्यासाठी जयंतरावांनी पुढाकार घ्यावा. अण्णा डांगे, आ. मानसिंगराव नाईक, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, पी. आर. पाटील, कॉंग्रेसच्या सरचिटणीस मनिषा रोटे, महाकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे, नगरसेवक खंडेराव जाधव यांची भाषणे झाली. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, ऍड. चिमण डांगे, दादासो पाटील उपस्थित होते.

आजी-माजी मुख्यमंत्री येणार !
आमच्याच काळातील तहसील कार्यालय इमारत बांधून तयार आहे. येत्या 17 जानेवारीला त्याच्या उदघाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले. बापूंची जन्मशताब्दी सुरू आहे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचे आधीच निमंत्रण दिले आहे, असेही ते म्हणाले

2024 मध्ये राष्ट्रवादी हा एक नंबरचा पक्ष
राष्ट्रवादीचा 50 आमदारांचा आकडा पूर्ण केल्यावर आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कोणीही सरकार स्थापन करु शकणार नव्हतं, त्याप्रमाणेच झालं. 2024 मध्ये राष्ट्रवादी हा राज्यातील एक नंबरचा पक्ष होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.