जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत पावसकरांचीच दौड?

कराडमध्ये लगबग, साताऱ्यात शांतता

जिल्हाध्यक्ष निवडीमुळे कराडमध्ये राजकीय उठबस सुरू असताना साताऱ्यात शांतता आहे. साताऱ्यात भाजप सदस्यांनी मंडल व जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवर बहिष्कार टाकल्यागत स्थिती आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले पक्षात सक्रिय नाहीत. आ. शिवेंद्रराजे सक्रिय असले तरी त्यांचे सारे लक्ष कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीकडे आहे. जिल्हा भाजपमध्ये राजे समर्थक व मूळचे निष्ठावंत, असे गट पडल्याची चर्चा आहे. 

सातारा – राज्यात सत्ता स्थापन करण्यात भाजपला अपयश आले असले तरी प्रदेश व जिल्हा कार्यकारिणी निवडीचे नगारे वाजू लागले आहेत. यांनाच पुन्हा संधी दिली जाण्याचे संकेत वरिष्ठांकडून मिळत आहेत. पक्षबांधणीतील योगदानमुळेच त्यांना मुदतवाढ दिली जाईल, अशी चर्चा असून अन्य इच्छुकांचे कान टवकारले आहेत.

जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादीला गेल्या पाच वर्षात बरेच धक्के दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि विशेषतः गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील भाजपची बांधणी करताना सात जिल्हा परिषद सदस्य, तीन शहरांमध्ये नगराध्यक्ष, 32 पंचायत समिती सदस्य आणि 21 हून अधिक ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात विक्रम पावसकरांना यश आले. जिल्ह्याच्या राजकारणात भाजपने खोलवर शिरकाव केला.

त्यासाठी विक्रम पावसकर यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन राजकीय कौशल्य पणाला लावले. 2016 साली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पावसकर यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जवाबदारी तत्कालीन महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. बूथ बांधणी व सदस्य नोंदणी या दोन्ही आघाड्यांवर पावसकरांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे तीन लाख 40 हजार सदस्य झाले असून 2900 बूथ व 2200 समन्वयक नेमून भाजपने राष्ट्रवादीला जोरदार हादरे दिले.

आता भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेप्रमाणे बूथ अध्यक्ष निवड, मंडल अध्यक्ष निवड, त्यानंतर जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य, प्रदेशाध्यक्ष निवड हे टप्पे 25 डिसेंबर ते 10 जानेवारी या दरम्यान पूर्ण केले जाणार आहेत. जिल्हाध्यक्षपदासाठी सातारा व कराड येथील सात जण इच्छुक आहे. या पदासाठी सध्या विक्रम पावसकर यांचे नाव आघाडीवर आहे. ऍड. भरत पाटील व साताऱ्यातून रवींद्र पवार हेदेखील इच्छुक आहेत. पवार यांचे दोन्ही राजांशी सलोख्याचे संबंध आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.