प्रवीण तुपे यांच्याबाबतचा निर्णय गुलदस्तात

आरोपांकडे दुर्लक्ष : 90 दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या सेवानिवृत्तीवरील निर्णय अद्याप गुलदस्त्यात असला तरी त्यांची “इच्छा’ पूर्ण करण्याची कार्यवाही प्रशासन विभागाकडून सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यांनी घेतलेले आक्षेप आणि तक्रारीकडे त्यांना 90 दिवसांच्या आतमध्ये सेवानिवृत्त केले जाण्याची शक्‍यता आहे.

आपली अतिरिक्त आयुक्त होण्याची पात्रता आणि सेवाज्येष्ठता असतानाही पालिकेतील राजकारणामुळे आपल्याला पदोन्नती देण्यात येत नसल्याचा आरोप विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी केला होता. तसेच आपली सेवानिवृत्ती घेण्याची इच्छा असल्याचे स्पष्ट करत त्यांनी आयुक्तांकडे राजीनामा दिला होता.

तुपे यांनी दिलेला राजीनामा सध्या प्रशासन विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून, त्यावर कायद्यानुसार 90 दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक आहे. या अर्जाचा विचार करून प्रशासन विभागाने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यासंदर्भातील “फाइल’ तयार केली आहे. ही फाइल सध्या प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त लोणकर यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे लोणकर यांच्या निर्णयानंतर अंतिम स्वाक्षरीसाठी ही फाइल आयुक्तांकडे जाणार असून, त्यावर आयुक्त निर्णय घेणार आहेत. त्यामुळे प्रवीण तुपे यांना स्वेच्छानिवृत्ती दिली जाण्याचाच निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. त्यांनी केलेले आरोप आणि पदोन्नतीसंदर्भात दोन महिन्यांत कोणतीच कार्यवाही न करता राजीनामा मंजुरीबाबतच प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे तुपे यांचे अतिरिक्त आयुक्त होण्याचे स्वप्न भंगणार असून, त्यांना स्वेच्छानिवृत्ती दिली जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.