बारामती (प्रतिनिधी) – मी जो काय आहे तो बारामतीकरांमुळेच आहे…. 91 पासून मला निवडून दिल. बारामतीकरांनी माझ्यावर अफाट प्रेम केले. पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बारामतीत अशा प्रकारचे स्वागत होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. बारामतीकरांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. बारामतीकरांचे प्रेम आशीर्वाद व पाठिंबा दहा हत्तींचे बळ देऊन जाते. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांच्या स्वागत सत्काराला प्रत्युत्तर दिले.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा बारामती येथे जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना पवार बोलत होते. प्रास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले. कार्यक्रमास सुनेत्रा पवार, पार्थ पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँक चेअरमन दिगंबर दुर्गाडे,
बारामती बँक चेअरमन सचिन सातव,छत्रपती कारखाना अध्यक्ष प्रशांत काटे,बाजार समिती सभापती सुनील पवार,बारामती दुध संघाचे चेअरमन पोपटराव गावडे,सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप,विश्वास देवकाते,माळेगांवचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे,योगेश जगताप,महिला शहर अध्यक्षा अनिता गायकवाड,तालुकाध्यक्षा वनिता बनकर आदी उपस्थित होते.
मी जे काय करतो आहे ते बारामतीकरांसाठी नेहमी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. रस्ते पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच विविध विकासकामे बारामती शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. झोपडपट्टी मुक्त बारामती करण्याचे स्वप्न असून प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विद्येचे माहेरघर म्हणून बारामतीची ओळख होत आहे .बारामती शहरात एक लाख मुले शिक्षण घेत आहेत. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वांनी मिळून काम केले तर बारामतीचा कायापालट होईल . सुदैवाने राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती आहेत असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.