लंडन – ब्रिटीश संग्रहालयातून सुमारे 2 हजार कलाकृती गहाळ झाल्या आहेत. या संग्रहालयाचे विश्वस्त जॉर्ज ओस्बोर्न यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळवण्यात आली आहे. या संग्रहालयातून किती आणि कोणकोणत्या कलाकृती गहाळ झाल्या आहेत, याची सविस्तर माहिती त्यांनी उपलब्ध करून दिली नाही.
या संग्रहालयातून गहाळ झालेल्या वस्तू ज्वेलरी, रत्ने, खडे आणि प्रेक्षकांना उपलब्ध करून न दिलेल्या सोन्याच्या कलाकृतींसारख्या “छोट्या वस्तू’ आहेत, असे लंडनच्या माजी महापौरांनी म्हटले आहे. मात्र एकूण नक्की किती वस्तू गहाळ झाल्या आहेत, हे अद्याप स्पष्ट नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अंदाजे 2 हजार वस्तू गहाळ झाल्या आहेत. मात्र हा एक अंदाज आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. गहाळ झालेल्या वस्तूंपैकी काही वस्तू परत मिळवायला सुरुवात झाली आहे. ही एक जमेची बाजू आहे.
मध्य लंडनमधील या संग्रहालयातून मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याची जबाबदारी स्विकारून हार्टविंग फिश्चर यांनी शुक्रवारीच राजीनामा दिला आहे. संग्रहालयाच्या प्रशासनाने एका कर्मचाऱ्याला गेल्या आठवड्यात कामावरून काढून टाकले असून पोलिसांना तपासासाठी पाचारण केले आहे.