नवी दिल्ली – हत्या प्रकरणी गेल्या 11 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला हरियाणा पोलिसांनी अंदमानातून अटक केली आहे. या आरोपीला या प्रकरणी दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार येथील अत्यंत दुर्गम वस्तीतून या आरोपीला शोधून काढून अटक करण्यात आली. ए.पी. सेल्वन असे या आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने आचारी आहे.
सेल्वन याने 2007 मध्ये पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याची पत्नी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये सापडली होती. त्यानंतर अंबाला येथून पोलिसांनी सेल्वन याला ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतर पुराव्याअभावी त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले,
त्यानंतर न्यायालयाने सेल्वन याच्याविरोधात न्यायालयाने नव्याने अटक वॉरंट जारी केले होते. मात्र तेंव्हापासून गेल्या 11 वर्षांपासून तो फरार होता.
अंदमानातील निकोबार जिल्ह्यातल्या विजयनगर या अत्यंत दुर्गम गावात तो रहात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार हरियाणा पोलिसांनी अंदमानातील चंबेल बे या दक्षिणेकडील टोकाच्या ठिकाणी जाऊन सेल्वन याला अटक केली.