886 नवीन रुग्णांची भर : 24 तासांत 23 जणांचा मृत्यू
पिंपरी – करोनामुळे मृत्यूच्या संख्येत झपाट्याने वाढत होत असल्याने शहरातील व शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या एकूण मृत्यूंचा आकडा एक हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचला आहे.
मंगळवारी करोनामुळे 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्य शासनाचे कोविड 19 पोर्टलनुसार 11 पिंपरी-चिंचवड मनपा रहिवाश्यांचे पूर्वी झालेले मृत्यू हे शहराच्या हद्दीबाहेरील झाल्याची नोंद घेतल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील करोना मृत्यूंचा आकडा 825 वर जाऊन पोहोचला आहे. तर हद्दीबाहेरील रहिवासी परंतु शहरात उपचार घेत असताना 169 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आता शहरातील एकूण मृत्यूंचा आकडा हा 994 इतका झाला आहे.
मंगळवारी शहरात 886 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आल्याने पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा 43 हजारांच्या पुढे गेला आहे. महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील 857 आणि शहराबाहेरील 29 जणांना करोनाची लागण झाली. आतापर्यंत शहरात 43374 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 20 व शहराबाहेरील 3 रुग्णांचा समावेश आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 6784 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 857 रुग्णांचाही समावेश आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मंगळवारी दिवसभरात शहरात 23 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील चिंचवड, रहाटणी, सांगवी, वाल्हेकरवाडी, किवळे, निगडी, मोशी, काळेवाडी, भोसरी, पिंपळे सौदागर, चऱ्होली येथील 20 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील देहूगाव, देहूरोड, मंचर येथील 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दिवसभरात 1158 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे घरी सोडण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या 29,733 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3777 संशयित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. 2159 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.