पुणे {प्रभात वृत्तसेवा} – गुजरातमधील जांभळांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात गुजरातमधील बडोदा भागातील जांभळांची आवक सुरू झाली आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात दररोज फळबाजारात एक ते दीड टन जांभळांची आवक होत आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो जांभळांचे भाव १०० ते ३०० रुपयांपर्यंत आहेत.
गुजरातमधील जांभळाचा हंगाम एप्रिल महिन्यात सुरू होताे. गुजरातमधील जांभळे आकाराने मोठी आणि चवीला गोड असतात. जांभळांचा हंगाम जून महिन्यापर्यंत सुरू राहतो. गेल्या काही वर्षांपासून जांभळाच्या मागणीत वाढ होत आहे. मधुमेहावर जांभूळ हितकारक मानले जात असल्याने त्याची मागणी वाढली असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील जांभूळ व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात जांभळांची आणखी आवक वाढणार आहे. साधारणपणे आठ ते दहा टनांपर्यंत जांभळाची आवक होईल. निवडक आणि चांगल्या प्रतीच्या एक किलो जांभळांचे दर घाऊक बाजारात ३०० रुपये किलोपर्यंत आहेत. पुढील आठवड्यात जांभळांच्या भावात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हंगाम बहरात आल्यानंतर साधारणपणे २० ते ३० टनांपर्यंत जांभळांची आवक होईल.
गुजरातनंतर स्थानिक गावरान जांभळांचा हंगाम सुरू होणार आहे. नगर जिल्हा, तसेच कोकणातील सावंतवाडी भागातून जांभळांची आवक सुरू होईल. सावंतवाडी परिसरातील जांभळे चवीला तुरट असतात. ग्राहकाकडून जांभळांच्या मागणीत वाढ होत असल्याचे व्यापारी सुपेकर यांनी सांगितले.
प्रक्रिया उद्योगांकडून मागणी
गेल्या काही वर्षांपासून प्रक्रिया उद्योगांकडून जांभळां च्या मागणीत जास्त वाढ झाली आहे. जांभळापासून आईस्क्रीम, सरबत तयार करण्यात येते. जून महिन्यात जांभळांची उच्चांकी आवक होते. त्यानंतर भाव कमी होतात. त्या वेळी प्रक्रिया उद्योगांकडून जांभळांच्या मागणीत वाढ होते, असे जांभूळ व्यापारी सुपेकर आणि आंबेकर यांनी नमूद केले.