नवी दिल्ली – नीट आणि जेईई या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे केंद्र सरकारने 28 लाख विद्यार्थ्यांच्या पुढे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण केला आहे, असे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
करोनाविषयाची दक्षता घेऊन या परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे; पण ही दक्षता किती परिणामकारक असेल या विषयी त्यांनी शंका व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, अत्यंत दक्षता घेऊनही केंद्रीय मंत्र्यांना करोना होत आहे. दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनाहीं करोना झाला आहे, अशा स्थितीत या परिक्षा आयोजित करून विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक आव्हानाचा मुकाबला करायला लावणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
परिक्षेला बसणाऱ्या 28 लाख विद्यार्थ्यांना करोना होणारच नाही अशी धारणा करूनच त्यांना परीक्षांना पाठवण्याचा निर्णय त्यांच्या पालकांना घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ताठरपणाची भूमिका न घेता अन्य पर्यायांचा विचार करून ही प्रवेश प्रक्रिया राबवली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.