LPG गॅससाठी वाट पाहण्याचे दिवस भूतकाळात जमा होणार; ३० मिनिटांत मिळणार घरपोच डिलिव्हरी

नवी दिल्ली – घरगुती वापरासाठीचे गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी दिवसेंदिवस प्रतीक्षा करण्याचे दिवस लवकरच भूतकाळजमा होणार आहेत. इंडियन ऑईल कार्पोरेशन सध्या ग्राहकांनी मागणी केल्यानंतर त्यांना तातडीने गॅस सिलेंडर भरून देण्याची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देता यावी यासाठी प्रयात्नशील असल्याचे वृत्त आहे. 

या सेवेचे नामकरण ‘तत्काळ एलपीजी सेवा’ असे करण्यात आले असून याद्वारे ग्राहकांना गॅस सिलेंडची मागणी केल्यानंतर अवघ्या ३० ते ४० मिनिटांमध्ये गॅस सिलेंडर घरपोच दिला जाईल.    

याबाबत इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेमध्ये, “प्रत्येक राज्याने वा केंद्र शासित प्रदेशाने किमान एक शहर अथवा जिल्हा असा निवडावा जेथे तत्काळ एलपीजी सेवा सुरु केली जाऊ शकेल. या सेवेद्वारे गॅस सिलेंडर भरण्याची विनंती केल्याच्या ३० ते ४० मिनिटांमध्ये ती पूर्ण केली जावी याची काळजी आम्ही घेऊ.” असं स्पष्ट करण्यात आलंय.

दरम्यान, केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना सेवा अधिक सुलभरीत्या उपलब्ध करून द्याव्या असं धोरण आखलं असून याचाच भाग म्हणून  इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ही सेवा उपलब्ध करून देण्याच्या विचाराधीन आहे.

“या सेवेमुळे आमच्याकडे बाजारपेठेतील आमच्या इतर स्पर्धकांसापेक्षा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी वेगळं असेल. तसेच आमचा ग्राहककेंद्रित दृष्टीकोन दृढ बनेल.” असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.

ही सुविधा ग्राहकांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार असून येत्या १ फेब्रुवारीपासून प्राथमिक स्तरावर सुविधा सुरु करण्याचा विचार असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमधील सूत्रांची दिली. यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या वितरकांचे जाळे वापरणार असल्याचीही माहिती आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.