पिंपरी (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड शहरावरील करोनाचे सावट दिवसेंदिवस वाढत आहे. आज बाधितांच्या संख्येमध्ये पुन्हा नऊने भर पडली आहे. गेल्या चोवीस तासांत 9 नव्या रुग्णांना संसर्ग झाला असून, यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर बाधित रुग्णांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आलेल्या इतर आठजणांना बाधा झाली आहे.
शहरात पहिल्या टप्प्यात 12 रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला होता. हे सर्व रुग्ण परदेशातून प्रवास करून आलेले होते. यातील पहिले 11 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते. एकच रुग्ण राहिल्याने शहर करोनामुक्तीच्या दिशेने चालले असतानाच दिल्लीतील तबलिगीच्या कार्यक्रमाला शहरातील 33 जणांनी हजेरी लावल्याने शहरात पुन्हा करोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 2 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीत शहरात 49 जणांना करोनाची बाधा झाल्याच्या स्पष्ट झाले आहे. तर याच कालावधीत एका बाधिताचा मृत्यूही झाल्याने शहरावरील करोनाचा धोका गडद झाला आहे.
शुक्रवारी सकाळच्या टप्प्यात चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर शुक्रवारी मध्यरात्री आणखी दोघांना बाधा झाली होती. त्यानंतर शनिवारी सकाळच्या टप्प्यात तिघांचा तर दुपारी आणखी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अवघ्या चोवीस तासांत 9 जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या 61 वर पोहोचली आहे. आजपर्यंत महापालिकेच्या वतीने 1337 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1202 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
15 जण आतापर्यंत करोनामुक्त झाले असून निगेटिव्ह अहवाल आलेले व करोनामुक्त झालेल्या 1217 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. तर एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. बाधितांपैकी 38 जणांवर तसेच 85 संशयितांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व संशयितांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर उर्वरित 7 बाधितांवर पुण्यातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2499 संशयितांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी 2076 जणांनी आपला 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला असून, उर्वरित 423 जणांचा कालावधी अद्याप पूर्ण होणे बाकी आहे.
दाट लोकवस्तीमधील रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा वेग वाढल्याने धोका वाढला आहे. अवघ्या 16 दिवसांत 49 रुग्णांची भर पडल्याने शहरावरील करोनाचे संकट तीव्र झाले असून आज दिवसभरात सापडलेले रुग्ण संभाजीनगर आणि रुपीनगर परिसरातील आहेत. शहराचा काही ठराविक परिसर वगळता सर्वत्र रुग्ण आढळू लागले आहेत. तर रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतांश रुग्ण हे दाट लोकवस्तीमधील असल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.