Air passenger । भारतात 2023 या वर्षात प्रथमच विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या तीन कोटींवर पोचलेली आहे. सीएपीए इंडिया या हवाई वाहतूक क्षेत्रात कन्सल्टंट म्हणून काम करणाऱ्या संस्थेकडे असलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळालेली आहे. देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांचा विचार केला तर सर्वाधिक म्हणजे ५४.७ टक्के प्रवाशांनी इंडिगोला पसंती दिलेली आहे. त्याखालोखाल विस्तारा १०.४ टक्के प्रवासी, एअर इंडिया ९.३ टक्के प्रवासी, स्पाईसजेट ८,४ टक्के, गोएअर ८.४ टक्के आणि उरलेले अन्य कंपन्या अशी आकडेवारी आहे.
प्रामुख्याने नागरिकांच्या वैयक्तिक कमाई मध्ये झालेली वाढ, देशात तयार झालेले नवे विमानतळ आणि नव्या मार्गांवरून सुरू झालेली विमान सेवा, छोट्या सुट्टीला जाण्यासाठी विमान प्रवास करण्याचा वाढता ट्रेंड यामुळे विमान प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांच्या संख्येतही वाढ झालेली आहे. देशातून 2023 या वर्षात 18 कोटी प्रवाशांनी देशांतर्गत किंवा परदेशात जाण्यासाठी विमानाने प्रवास केला आहे.
प्रथमच विमान प्रवास करणाऱ्या तीन कोटी प्रवाशांपैकी 36 टक्के प्रवाशांनी इंडिगोच्या हवाई सेवेची निवड केलेली होती. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवेचा विचार करता मागील वर्षीच्या तुलनेत इंडिगोच्या प्रवासी संख्येत 28 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. ऑगस्ट 2022 मध्ये आकासा ही नवी कमी भाडे आकारणारी विमान कंपनी सुरू झाली.
मागील वर्षात प्रथमच विमान प्रवास करणाऱ्या पैकी दहा टक्के प्रवाशांनी आकासा एअरची प्रवासासाठी निवड केली होती असे सांगण्यात येते. 2023 या वर्षात देशांमध्ये आठ नवे विमानतळ कार्यान्वित झाले. तसेच 60 नवे देशांतर्गत हवाई मार्ग कार्यरत झाले. त्यामुळे देखील देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली आहे.