मकरसंक्रांतीसाठी बाजारपेठेमध्ये महिलांची गर्दी

पिंपरी – मकरसंक्रांतीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठेत सणाच्या साहित्यासह महिलासांठी आकर्षक कपड्यांनी सजून गेली असून महिलांची बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे दिसत आहे.

मकरसंक्रांत हा महिलांचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे, मकरसंक्रांतीच्या अगोदर महिला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असतात. काही कापड व्यावसायिकांनी साड्यांच्या खरेदीवर दहा ते वीस टक्के, तसेच दोन साड्यांच्या खरेदीवर एक साडी फ्री अशा योजना जाहीर केलेल्या आहेत. साड्यांच्या खरेदीसाठी आकर्षक योजना असल्याने शहरासह उपनगरातही मागील आठ दिवसांपासून महिला साड्यांच्या खरेदीसाठी दुकानात गर्दी करीत आहेत. तसेच हलव्याच्या दागिन्यांनाही चांगली मागणी आहे.

नवविवाहिता तसेच लहान मुलांसाठी हलव्याचे दागिने मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. साड्याच्या दुकानासह सोन्याचे दागिने आणि सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानातही गर्दी होत आहे. याबरोबरच पिंपरी कॅम्पमधील भाजी मंडई परिसरात वाणाचे साहित्य, हळदी-कुंकू, बांगड्या, सुगडे आदी वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. शिवाय संक्रांतीमध्ये वाण लुटण्यासाठी वेगवेगळ्या वस्तुंची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.