पर्यटक दाम्पत्याची कार दरीत कोसळून पत्नी ठार

पसरणी घाटात दांडेघरनजीक अपघात; सुदैवाने पती बचावला; ट्रेकर्सनी केले बचावकार्य

पाचगणी  – पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटाच्या सुरुवातीलाच असलेल्या दांडेघर गावच्या हद्दीत हॅरिसन फॉली (थापा) वरून पर्यटकांची मारुती इर्टिगा कार (एमएच-01-बीजे-7865) कार रविवारी रात्री उशिरा खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात कारमधील सना कुमेल खतायू (नागपाडा, मुंबई) या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती कुमेल बिलाल खतायू हे सुदैवाने बचावले.

याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, कुमेल व सना खतायू हे नागपाडा, मुंबई येथील दाम्पत्य मारुती इर्टिगा कारमधून पाचगणी व महाबळेश्‍वरला पर्यटनाला आले होते. हे दाम्पत्य काल (दि. 12) सायंकाळी वाईच्या दिशेने जात असताना कुमेल यांनी कार वेगाने थाप्याच्या प्रवेशद्वारातून आत घातली. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा कारवरील ताबा सुटला.

त्यामुळे कार 300 ते 400 फूट दरीत कोसळली. त्यावेळी कुमेल व सना गाडीतून बाहेर फेकले गेले. या घटनेची खबर मिळताच पाचगणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एसओएस ग्रुप (पाचगणी) व महाबळेश्‍वर ट्रेकर्सच्या सदस्यांना बोलावले. त्यांचे सदस्य काही वेळातच तेथे दाखल झाले. दोराच्या साह्याने पोलीस व ट्रेकर्सनी अंधारात दरीत उतरून शोध घेतला. त्यावेळी जखमी अवस्थेतील कुमेल खतायू सापडले. त्यानंतर काही वेळाने त्यांची पत्नी सना खतायू यांचा मृतदेह सापडला.

मृतदेह दरीतून काढून आज सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली. सनाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. जोरदार थंडी व काळोख असूनही सहाय्यक फौजदार मारुती इथापे, अरविंद माने, हवालदार अविनाश बाबर, पोलीस नाईक विजय मुळे, सूरज गवळे, कीर्तिकुमार कदम, सागर नेवसे, एसओएस ग्रुपचे सदस्य सुनील उंबरकर, निहाल बागवान, मेहुल पुरोहित, अजय बोरा, अनिस सय्यद, विशाल गायकवाड, राजू भंडारी, नरेश लोहारा, महाबळेश्‍वर ट्रेकर्सचे कुमार शिंदे, अनिल केळगणे, सुनील वाडकर, अक्षय नाविलकर हे या मोहिमेत सहभागी झाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)