नवी दिल्ली- देशातील करोना रुग्ण बरे होण्याचा दर आता 91.68 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, देशातील एकूण कोविडग्रस्तांची संख्या आता 82 लाख 29 हजार 313 इतकी झाली आहे.
आरोग्यमंत्रालयाने आज करोनाच्या संबंधात जे अपडेट दिले आहेत त्यानुसार गेल्या 24 तासांत देशातील 45 हजार 231 जणांना करोनाची नव्याने लागण झाली आहे. तथापि रुग्णांचे प्रमाण अजूनही बरेच मोठे असले तरी देशातील आता एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 75 लाख 44 हजार 798 इतकी झाली आहे.
सध्याची सक्रिय बाधितांची संख्या आज लागोपाठ चौथ्या दिवशी सहा लाखांच्या खाली राहिली आहे. सक्रिय बाधितांची सध्याची संख्या 5 लाख 61 हजार 908 इतकी आहे. हे प्रमाण एकूण रुग्ण संख्येच्या केवळ 6.83 टक्के इतके आहे.
करोनाग्रस्तांच्या या आकडेवारीशी इंडियन मेडिकल कौन्सिलच्या आकडेवारीशी तुलना केली जात असून यातील त्रुटी आणि तफावत दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.