इस्लामाबाद – पाकिस्तानचे वादग्रस्त गृहमंत्री ब्रिगेडिअर एझाझ शाह यांनी विरोधकांवर तालिबानी हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून व्हायला लागली आहे.
ब्रिगेडिअर शाह यांचे दहशतवाद्यांबरोबर संबंध असल्याचे बोलले जाते आहे. ब्रिगेडिअर शाह यांचे दहशतवाद्यांना समर्थन आहे या आरोपांचा पुरावाच त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून दिला आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
नानकाना साहिब या आपल्या मूळ गावी झालेल्या एका समारंभामध्ये बोलताना एझाझ यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. दहशतवादावरून राजकारण करणाऱ्या आवामी नॅशनल पार्टीच्या नेत्यांवर सत्तारुढ तेहरीक-ए-तालिबान-पाकिस्तानने तालिबानकरवी हल्ले केले आणि अनेक नेत्यांची हत्या केली आहे. बशीर बिलौर आणि त्यांचा मुलगा मिलान इफ्तकार यांचीही हत्या करण्यात आली आहे, असे शाह यांनी उघडपणे सांगितले.
“एन-लीगच्या समर्थकांचे रक्षण व्हावे आणि त्यांना दैवी मार्गदर्शन मिळावे, अशी मी प्रार्थना करतो.’ असे ब्रिगेडिअर शाह यांनी सांगितले आणि विरोधकांना उघड इशारा दिला. इम्रान खान यांच्या सरकारच्या विरोधात पाकिस्तान पीपल्स पार्टी, आवामी नॅशनल पार्टी आणि अन्य छोट्या पक्षांनी मिळून लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासठी एक आघाडी स्थापन केली आहे.
या आघाडीने सोमवारी शाह यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ब्रिगेडिअर शाह यांचे वक्तव्य दहशतवादाविरोधातील राष्ट्रीय कृती आराखड्याचे उल्लंघन आहे, अशी टीका पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी केली आहे.
पाकिस्तानची गुप्तहेर संघटना “इंटर सर्व्हिस इंटिलिजन्स’चे माजी संचालक असलेले निवृत्त ब्रिगेडिअर एझाझ शाह यांनी यापूर्वीही दहशतवादाविरोधाच्या धोरणावर टीका करून दहशतवाद्यांचे समर्थन केले होते.