नवी दिल्ली – कॉंग्रेस आणि त्या पक्षाच्या नेत्यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी, मोदींच्या अपयशाची किंमत देशाला चुकवावी लागत असल्याचे टीकास्त्रही कॉंग्रेसकडून सोडण्यात आले. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सोशल मीडियावरून मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
त्याचवेळी कॉंग्रेसकडून मोदींवर निशाणाही साधण्यात आला. युवक कॉंग्रेसने मोदींच्या वाढदिवशी राष्ट्रीय बेरोजगारी दिन पाळला. कॉंग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकारांशी बोलताना मोदींवर टीकेची तोफ डागली. मागील सात वर्षांत मोदींना अनेक आघाड्यांवर अपयश आले. देश कुठे नेऊन ठेवलाय याची जाणीव मोदींना व्हावी अशी प्रार्थना आम्ही ईश्वराकडे करतो.
देशातील सध्याच्या स्थितीमुळे मोदींचा वाढदिवस बेरोजगारी दिन, शेतकरीविरोधी दिन, महागाई दिन म्हणून साजरा होत आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी त्यांनी केली.
मोदींच्या मोठमोठ्या आश्वासनांनंतरही देशातील बेरोजगारांची संख्या सर्वांधिक आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन नऊ महिने उलटून गेल्यानंतरही सुरूच आहे. इंधने, खाद्यतेले, डाळी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या भरमसाठ किमतीमुळे सामान्य जनतेचे जीणे अवघड बनले आहे.
नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था दुबळी बनली. अनेक छोटे उद्योग-व्यवसाय बंद पडले. तसे असूनही मोदींनी देश विकायला काढला आहे. करोना संकटात देशाला ऑक्सिजन, औषधे आणि लसींचा तुटवडा भेडसावला. मात्र, मोदी निवडणूक प्रचारात व्यस्त राहिले. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. लोकशाही, राज्यघटनेला धक्के बसत आहेत, असे टीकास्त्रही श्रीनेत यांनी सोडले.