सीआरपीएफचा प्रत्येक आघाडीवर विजयाचा झेंडा – अमित शहा

नांदेड – सीआरपीएफवर देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी होती. त्यानंतर दंगली रोखणे, नक्षलवाद्यांशी लढा, ईशान्येकडे काम करण्याची, काश्‍मीरमध्ये काम करण्याची जबाबदारी आली. सीआरपीएफ जवानांनी प्रत्येक गरजेनुसार स्वत:ला त्या कार्यानुरूप बदलत प्रत्येक अपेक्षा पूर्ण करण्याचे चांगले काम केले.

प्रत्येक आघाडीवर सीआरपीएफचा विजयाचा झेंडा अभिमानाने उंचावला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. केंद्रीय सशस्त्र पोलीस बलातर्फे सुरु असलेल्या “अखिल भारतीय वृक्षरोपण अभियान-2021’अंतर्गत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात 1 कोटी व्या वृक्षाचे रोपण केले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सीआरपीएफचे महा संचालक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जवानही उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले, अनिर्बंध विकासकामांमुळे जागतिक पर्यावरणाची मोठी हानी झालेली आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हे दोन धोके प्रत्येक देशाचे शत्रू आहेत. गेल्या काही काळापासून अतिवृष्टी, दुष्काळ, भूस्खलन यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. यांचे मूळ कारण हवामान बदल हेच आहे.

वेगवान विकासासोबतच जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल या समस्या सोडविण्याचा मुद्दा आपल्या प्रणालीत समाविष्ट करून घ्यावा लागेल. त्यासाठीचा सर्वात साधा उपाय म्हणजे कार्बनचे उत्सर्जन कमी करणे आणि उत्सर्जित कार्बनची योग्य प्रकारे व्यवस्था लावणे आणि त्यासाठी झाडांची संख्या वाढविणे हा सर्वात उत्तम मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

सीआरपीएफ शिवाय देशाच्या अंतर्गत सुरक्षेची कल्पना केली जाऊ शकत नाही, हे वास्तव आहे. संपूर्ण राष्ट्राला सीआरपीएफ जवानांच्या त्यागाचा, बलिदानाचा आणि समर्पणाचा अभिमान आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यात सीआरपीएफचे योगदान उल्लेखनीय आहे. सीआरपीएफच्या समर्पित आणि उल्लेखनीय योगदानाशिवाय देशाचा विकास आणि पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनणे शक्‍य नाही, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.