पिंपरी – सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शाळा सुरू करण्यात येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन ऑनलाईन अभ्यासक्रम महापालिका सुरू करणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे शिकविण्यासाठी चार एफएम स्टेशन सुरू केली जाणार आहेत. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस नोऱ्होना यांनी दिली.
महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळा असून 42 हजार 108 इतकी विद्यार्थी संख्या आहे. तर, 1105 शिक्षक कार्यरत आहेत. त्याशिवाय महापालिकेच्या 24 माध्यमिक शाळा आहेत. त्यामध्ये 8870 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संबंधित शाळांमध्ये 185 शिक्षक कार्यरत आहेत. करोनामुळे यावर्षी शालेय वर्षाबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा निर्णय घेऊन 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे.
महापालिकेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे गरीब कुटूंबातील असल्याने ऑनलाईन शिक्षण देताना अनेक अडथळे येणार आहेत. त्यासाठी महापालिकेकडून या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा विचार सुरू आहे.
एका बाजूला ऑनलाईन शिक्षण देण्याबरोबरच इतरही बाबींचा विचार महापालिकेने सुरू केला होता. त्यातून एफएम रेडीओ स्टेशन सुरू करण्याबाबत आता निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून मराठी, हिंदी, उर्दू आणि सेमी इंग्रजी या चार भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. प्रत्येक भाषेणासाठी स्वतंत्र एफएम रेडीओ स्टेशन उभारले जाणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. महापालिका कार्यक्षेत्रात रहात असलेल्या 15 ते 20 किलोमिटर अंतरापर्यंत या एफएमची सुविधा मिळणार आहे. महापालिकेचे शिक्षक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एका धड्याचे रेकॉर्डिंग करणार असून हे रेकॉर्डिंग एफएमच्या माध्यमातून प्रसारीत करण्यात येणार आहे.
वेबपोर्टलवरही रेकॉर्डिंग उपलब्ध होणार
एफएमसाठी तयार करण्यात आलेले रेकॉर्डिंग महापालिकेच्या अधिकृत वेबपोर्टलवरही उपलब्ध करून दिले जाणार आहे. या ठिकाणी डाऊनलोडींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांनाही होणार असल्याचे थॉमस नोऱ्होना यांनी सांगितले.