प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 –स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना घटनाकारांना अभिप्रेत व संविधानाला सुसंगत समाज न घडणे हे आपले दुर्दैव आहे. त्यामुळे संवेदनशील समाज ही यशस्वी लोकशाहीची पहिली गरज असून, तो घडवण्यासाठी नवीन मूल्यांवर आधारित शिक्षण व्यवस्था गरजेची आहे. लोकशाहीच्या वर्तमानाला हानी पोहोचत असताना संविधानाला सुसंगत समाज घडून भारताच्या मातीमध्ये नवप्रबोधनाची बीजे रुजणे आवश्यक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
राज्याचे विरोधी पक्ष नेते व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अनंत व्याख्यानमालेमध्ये “भारतीय संविधान व आजचे वर्तमान’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व मानद सचिव ऍड. संदीप कदम, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सचिव वि. दा. पिंगळे, फुले-शाहू-आंबेडकर मंचचे विठ्ठलराव गायकवाड उपस्थित होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. माजी आमदार डॉ. जयदेव गायकवाड अध्यक्षस्थानी, तर लेखक डॉ. राजन गवस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक स्थितीवर सद्य राजकारणाचा दुरगामी परिणाम होत असताना या व्याख्यानमालेतील तज्ज्ञांच्या विचार मंथनातून तरुणाईला दिशा देणारी विचारधारा रूजेल, असे मत डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. ऍड. संदीप कदम यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी वि. दा. पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.