आंध्रप्रदेशातील मलकाजगिरी हा मतदारांच्या संख्येच्या दृष्टीने देशातील सर्वांत मोठा लोकसभा मतदारसंघ आहे. आंध्रातील 42 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या या मतदारसंघात तब्बल 29.53 लाख मतदार आहेत. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील 90 टक्के मतदार हे सुशिक्षित आणि शहरी मध्यमवर्गात मोडणारे आहेत. या लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा मतदारसंघ आहेत.
2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत या “महाकाय’ मतदार संघातून कॉंग्रेसचे सर्वे सत्यनारायण विजयी झाले होते. या निवडणुकीत तब्बल 19 उमेदवार येथून रिंगणात उतरले होते. सत्यनारायण यांना 3.88 लाख मते मिळाली होती. यंदा ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. याचे कारण आंध्रच्या विभाजनानंतर आता ही जागा तेलंगणामध्ये गेली आहे.