प्रचंड क्षमता असणारा आणखी एक नेता कॉंग्रेसने गमावला – प्रिया दत्त हळहळल्या

मुंबई -राजस्थानमधील तरुण आणि प्रभावी नेते सचिन पायलट यांच्यावर कॉंग्रेसने कारवाईचा बडगा उगारल्याने पक्षातील काही नेते हळहळले आहेत. त्यातून प्रचंड क्षमता असणारा आणखी एक नेता कॉंग्रेसने गमावल्याची खंत पक्षाच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी व्यक्त केली.

पायलट यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना प्रिया यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचाही संदर्भ दिला. आणखी एक मित्र कॉंग्रेसमधून बाहेर जात आहे. ज्योतिरादित्य आणि पायलट यांच्या रूपाने आमच्या पक्षाने प्रचंड क्षमता असणारे दोन तरुण नेते गमावले आहेत.

कठीण काळात त्यांनी अतिशय मेहनत घेतली. महत्त्वाकांक्षी असणे गैर असल्याचे मला वाटत नाही, असे ट्विट प्रिया यांनी केले. कॉंग्रेसच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक नेते जितीन प्रसाद यांनीही पायलट यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली.

पायलट यांनी अनेक वर्षे कॉंग्रेससाठी निष्ठेने कार्य केल्याचे कुणीच नाकारू शकणार नाही. घडामोडी इथपर्यंत येणे दुर्दैवी आहे. अजूनही स्थिती योग्यप्रकारे हाताळली जाण्याची आशा वाटते, असे त्यांनी ट्‌विटरवरून म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.