मुंबई –एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या भावात मंगळवारी 2.94 टक्क्यांची घट झाली. या बॅंकेद्वारे वितरित केलेल्या वाहन कर्जासंदर्भात काही गैरप्रकार उघडकीस आल्याचे बोलले जाते.
बॅंकेने यासंदर्भात चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी बॅंकेच्या एका निवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा संबंध असल्याचे बोलले जाते. बॅंकेने यासंदर्भात चौकशी सुरू केली असून या चौकशीचा बॅंकेच्या ताळेबंदावर किंवा नफ्यावर कसलाही परिणाम होणार नाही, असे बॅंकेने स्पष्ट
केले आहे.
बॅंकेनेही अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा आरोप झाल्यानंतर बॅंक प्राथमिक चौकशी करीत असते. मात्र, बॅंकेचा एकूण ताळेबंद मजबूत असून या घटनेचा बॅंकेवर कसलाही परिणाम होणार नाही, असे बॅंकेच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले असले तरी मंगळवारी या बॅंकेच्या शेअरच्या भावावर परिणाम झाला असल्याचे दिसून आले.
निर्देशांकांत मोठी घट
दरम्यान, निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्री केल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक 1.8 टक्क्यापर्यंत कोसळले. बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 660 अंकांनी म्हणजे 1.80 टक्क्यांनी कमी होऊन 36,033 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 195 अंकांनी कोसळून 10,607 अंकांवर बंद झाला. रुपयाचे मूल्य आज 23 पैशांनी कमी होऊन 75.42 रुपये प्रति डॉलर झाले.