हवेलीतील रुग्णाचा पुरंदरमध्ये मृत्यू
खासगी रुग्णालयात बेडची कमतरता
पूर्व हवेली तालुक्यात विदारक अवस्था
सोरतापवाडी (वार्ताहर) – हवेली तालुक्यातील करोना बाधित रुग्णांचे हाल होत असून वेळेवर बेड मिळत नाही. उपचारासाठी रुग्णांची प्रचंड प्रमाणात हेळसांड सुरु असल्याचे दिसून येत आहे. याच कारणांमुळे उरुळी कांचन येथील 75 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.
उरुळी कांचन येथील ही व्यक्ती गुरुवारी आजारी असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी गेली असता तेथील डॉ. सुचिता कदम यांनी तपासणी केली. या रुग्णाला श्वसनाचा त्रास असल्याचे कळल्यावर कदम यांनी अनेक हॉस्पिटलना फोन करुन ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे का, याची विचारणा केली; पण पुणे शहर व पूर्व हवेलीत कुठेही बेड उपलब्ध झाले नाही. शेवटी सासवड येथील एका हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांची करोना चाचणी घेण्यात आली. पहिली चाचणी फेल गेल्याने दुसरी चाचणी शनिवारी घेण्यात आली. पण सोमवारी पहाटे रुग्णाचे निधन झाले दुसऱ्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टर कदम यांनी सांगितले.
उरुळी कांचनमध्ये रुग्णसंख्या 110वर
उरुळी कांचनमध्ये आजपर्यंत करोना बाधितांची संख्या 110वर पोचली असून 80 जणांनी करोनावर मात करून घरी आले आहे 29 रुग्णांवर उपचार चालू असून एक मयत आहे. आज दोन जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती डॉ. कदम यांनी दिली. एकूण 15 जणांना क्वारंटाइन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.