15 ऑगस्टपासून राज्यात याची अंमलबजावणी
शेती, बिनशेती क्षेत्रासाठी वेगवेगळा उतारा
पुणे – जमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा पुरावा असलेल्या संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यामध्ये आता बदल होणार आहे. सातबारा उतारा सर्वसामान्य नागरिकांना वाचता यावा, यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. येत्या 15 ऑगस्टपासून राज्यात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. संगणकीकृत सातबारा उताऱ्यावर आता शासनाचा आणि ई-महाभूमीचा लोगो असलेला वॉटरमार्क, गावाच्या नावाचा कोड, त्याचबरोबरच शेती आणि बिनशेतीसाठी सातबारा उतारा वेगवेगळा असणार आहे.
बनावट सातबारा उतारा दाखवून त्यांची खरेदी-व्रिकी करणे आदी प्रकार यापूर्वी घडले आहे. सातबारा उतारा हा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही. त्यातून हे प्रकार घडतात. त्यामुळे संगणकीकृत सातबारा उताऱ्याच्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला होता. 7/12 उतारा सामान्यांना समजणे आवश्यक होते.
याविषयी उपजिल्हाधिकारी तथा ई फेरफार प्रकल्पाचे समन्वयक रामदास जगताप म्हणाले, “7 म्हणजे जमिनी मालकी सातबारा होणार वाचायला सोपा (भोगवटादार) असलेल्यांची नावे आणि त्यांच्याकडे असलेले क्षेत्र, तर 12 मध्ये पीकपाण्याची नोंद असते. त्यामुळे त्याला सातबारा उतारा म्हटले जाते. आता त्याच्या नमुन्यामध्ये बदल होणार असल्यामुळे तो समजण्यासाठी अधिक सोपा आणि माहितीपूर्ण होणार आहे.’
हे असणार बदल
– शेती क्षेत्रासाठी हे. आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे.
– खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात कंसात नमूद केला जात असे. तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे.
– मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई-कराराच्या नोंदी कंस करून भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येणार आहे.
– बिनशेती क्षेत्रासाठीच्या नमुनावर 12 छापला जाणार नाही. तो फक्त नुमना 7 असणार आहे. क्षेत्र अकृषिक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न. 12 ची आवश्यकता नाही. अशी सूचना त्यावर छापण्यात येणार आहे.