सातारा – सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याचे निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन विक्री रकमेचे बिल तयार करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक उदय जगन्नाथ सावंत (वय 51, रा. शासकीय निवासस्थान, सातारा. मूळ रा. राणंद ता. माण) याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी असून त्यांचे निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन विक्री रकमेचे बिल तयार करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयात काम होते. या कामासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिक उदय सावंत यांनी तक्रारदारांकडे सात हजार रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रारदारांनी दि. 31 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार सावंत यांना सापळा रचून सात हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
त्याच्याविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण, सातारचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहायक फौजदार सपकाळ, पोलीस हवालदार शिंदे, काटवटे, पोलीस नाईक ताटे, राजे, अडसूळ, पोलीस कॉन्स्टेबल काटकर, येवले, भोसले, वायदंडे, सपकाळ यांनी काम पाहिले.