सातारा – सातारा पंचायत समितीच्या सभापतिपदी किडगाव गणाच्या सदस्या सौ. सरिता संभाजी इंदलकर तर उपसभापतिपदी कारी गणातील सदस्य अरविंद हरिभाऊ जाधव यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा पंचायत समितीवर पुन्हा आपले निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.
सातारा पंचायत समितीवर स्थापनेपासून अभयसिंहराजे भोसले यांचे आणि त्यांच्या निधनानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व राहिले आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत आ. शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी 11 जागा जिंकून पंचायत समितीत सत्ता मिळवली होती. माजी खासदार उदयनराजे भोसले यांना मानणारे सहा तर भाजपचे तीन सदस्य निवडून आले होते.
पहिल्या अडीच वर्षांसाठी खेड गणातील मिलिंद कदम यांना सभापतिपद तर लिंब गणातील जितेंद्र सावंत यांना उपसभापतिपद मिळाले होते. पुढील अडीच वर्षांसाठी सातारा पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले होते. किडगाव गणातील सरिता इंदलकर आणि अंबवडे गणातील विद्या देवरे यांच्यात रस्सीखेच होती. उपसभापतीपदासाठी आशुतोष चव्हाण, राहुल शिंदे, अरविंद जाधव यांच्यात रस्सीखेच होती.
पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी सकाळी सभापती आणि उपसभापती निवडीची प्रक्रिया पार पडली. सभापतिपदासाठी चार आणि उपसभापतिपदासाठी तीन अर्ज नेण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात सभापतिपदासाठी सौ. सरिता इंदलकर तर उपसभापतिपदासाठी अरविंद जाधव यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) तथा पीठासन अधिकारी मंजुषा मिसकर यांनी सरिता इंदलकर आणि अरविंद जाधव यांच्या बिनविरोध निवडी झाल्याचे जाहीर केले.
गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी सचिव म्हणून काम पाहिले. बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर पंचायत समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. निवडीनंतर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पंचायत समितीत येऊन नूतन सभापती सरिता इंदलकर आणि उपसभापती अरविंद जाधव यांचे अभिनंदन केले. सातारा पंचायत समितीमध्ये सुरवातीपासून अभयसिंहराजे यांची सत्ता राहिली असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे त्यांचे धोरण होते.
नूतन पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना मार्गी लावाव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी मावळते सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, बाजार समितीचे चेअरमन विक्रम पवार, अरुण कापसे यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अर्ज नेले.. पण भरलेच नाहीत
सातारा पंचायत समितीवर आ. शिवेंद्रराजे यांची निर्विवाद सत्ता असल्याने सभापती, उपसभापती निवडी बिनविरोध होतील अशी शक्यता होती. मात्र, उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सदस्यांनी उमेदवारी अर्ज पीठासन अधिकाऱ्यांकडून घेतल्याने निदान उपसभापतिपदासाठी तरी निवडणूक होईल, अशी शक्यता होती. मात्र त्यांनी अर्जच दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध झाली. विशेष म्हणजे सभागृहात उपस्थित राहून उदयनराजे समर्थक सदस्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे पंचायत समितीत मनोमिलनाचे वारे वाहू लागल्याचे स्पष्ट झाले.