मुंबई – गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना वीरमरण आलं. त्यामुळे चीन-भारत संबंध ताणले गेले आहेत. या विषयावरून राजकारण प्रचंड तापलं असून, दररोज नवंनवे प्रश्न सरकारला विचारले जात आहेत. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरून म्हणत पंतप्रधानांनी त्याकामी पुढाकार घ्यावा. असं सामनाच्या रोखठोख लेखातून भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.
हिंदुस्थानच्या सर्व सीमा अशांत आहेत. आपल्या सीमेवरची बहुतेक राष्ट्रे चीनची मांडलिक आहेत. त्या चीननेही आता आमच्यावर आक्रमण केले! परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित आहे. अमेरिकेचे ट्रम्पही उद्या निवडणूक हरतील. मोदींच्या बाजूने आता कोण उभे राहील? चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली. अशा शब्दात सामनातून टीका केली आहे.
आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर या मुद्यावर निशाणा साधत ‘सर्वच सीमा अशांत! बाहुबली राजकारणाची हवा निघाली! ‘हा रोखठोख लेख लिहण्यात आला आहे.
काय आहे सामनाचा रोखठोख लेख ?
हिंदुस्थानच्या सर्व सीमा अशांत आहेत. आपल्या सीमेवरची बहुतेक राष्ट्रे चीनची मांडलिक आहेत. त्या चीननेही आता आमच्यावर आक्रमण केले! परराष्ट्र व संरक्षणविषयक चुकलेल्या धोरणाचे हे फलित आहे. अमेरिकेचे ट्रम्पही उद्या निवडणूक हरतील. मोदींच्या बाजूने आता कोण उभे राहील? चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली.
हिंदुस्थानसारख्या देशात अधूनमधून कसल्या ना कसल्या तरी लाटा येतच असतात. कोरोनाच्या लाटेचा जोर कायम असतानाच देशात चीनविरोधी संतापाची लाट उसळली आहे, पण काही संताप हे षंढ असतात. असे षंढ संताप चीनच्या बाबतीत अनेकदा निर्माण झाले आहेत. मार्च 2016ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा क्युबाच्या भूमीवर उतरले तेव्हा जगाला आश्चर्य वाटले. पन्नास वर्षे अमेरिका व क्युबाचा संवाद नव्हता. पन्नास वर्षांत प्रथमच अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष क्युबाच्या भूमीवर अवतरला होता. क्युबाचे क्रांतिकारी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो हे अमेरिकेला कट्टर दुश्मन मानत. अमेरिकेने त्या पन्नास वर्षांत कॅस्ट्रो यांना मारण्याचा 634 वेळा प्रयत्न केला. त्या काळात अनेक राष्ट्राध्यक्ष अमेरिकेत आले व गेले, पण कॅस्ट्रो क्युबाचे सत्ताधीश म्हणून कायम राहिले. वयोपरत्वे फिडेल कॅस्ट्रो अधिकारी पदावरून दूर झाले. नवे राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो हे झाले. त्यांच्या काळात ओबामा यांनी क्युबाला भेट दिली. ओबामा क्युबाविषयी भरभरून बोलले. सर्व वाद मिटवायची भाषा केली. तेव्हा क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांनी त्यांच्या बंद खोलीतून एकाच ओळीचे निवेदन प्रसिद्ध केले. ”अमेरिकेला क्युबाविषयी आलेला हा प्रेमाचा उमाळा पाहून क्युबाच्या जनतेला हार्टअटॅक येईल.” कॅस्ट्रोंनी योग्य बाण मारला. ओबामा अस्वस्थ झाले. या प्रसंगाचा संदर्भ द्यायचे कारण इतकेच की, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग दोन वर्षांपूर्वी अहमदाबादेत पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून आले होते. सर्व वाद मिटतील असे ते म्हणाले होते, पण तेव्हाही माझ्या मनात तेच विचार आले जे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबाबत फिडेल कॅस्ट्रो यांच्या मनात आले होते. या लोकांवर विश्वास ठेवता येत नाही. चार दिवसांपूर्वी लडाखच्या हद्दीत जो रक्तरंजित संघर्ष झाला तो पाहिल्यावर चीनचा खरा चेहरा पुन्हा उघडा पडला!