नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनावरून सातत्याने चीनवर आरोप करत आले आहेत. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका रॅलीमध्येही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा करोनाच्या प्रसाराचा ठपका चीनवर ठेवला. यावेळी ट्रम्प यांनी करोनाचा उल्लेख कुंग फ्लू असा करत चीनवर हल्लाबोल केला.
चीनच्या वुहान शहरात करोनाचा विषाणू आढळून आला होता. त्यानंतर हळूहळू चीननंतर जगभरात हा विषाणू पसरला. जगभरात या विषाणूने ४ लाक ५० हजार लोक मरण पावले आहेत. तर ८.५ मिलियन लोकांना संसर्ग झाला आहे. करोना संसर्गानं अमेरिकेत प्रचंड मोठं आव्हान उभं केलं आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडाही मोठा असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह ट्रम्प प्रशासन करोनासाठी चीनवर आरोप करत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची शनिवारी ओक्लाहोमामधील तुल्सा येथे प्रचारसभा झाली. यावेळी ट्रम्प यांनी करोनासाठी चीन जबाबदार असल्याचा पुर्नरूच्चार केला. करोनाविषयी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी याला कुंग फ्लू म्हणू शकतो. मी त्याचा उल्लेख १९ वेगवेगळ्या नावांनी करू शकतो. अनेक जण त्याला व्हायरस म्हणतात. जो की तो आहेच. तर अनेक जण त्याला फ्लू म्हणतात. काय फरक आहे. मला वाटत आपल्याकडे करोनाची १९ ते २० नावं आहेत, असं सांगत ट्रम्प यांनी चीनला डिवचण्याचा प्रयत्न केला. कुंग फू हा चीनमधील मार्शल आर्टचा प्रकार आहे. ज्यात हात व पायांचा वापर करून लढलं जातं.
जॉन हॉपकिन्स करोना व्हायरस केंद्राच्या माहिती प्रमाणे जगात सध्या साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांचे बळी करोना व्हायरसमुळे गेले आहेत. तर ८.५ मिलियन लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत करोना बाधितांची संख्या २.२ मिलियन इतकी आहे. तर मृतांची संख्या १ लाख १९ हजार इतकी आहे.