दुबई – लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी संयुक्त अरब अमिरातीचे लष्करप्रमुख सालेह महंमद सालेह अल अमेरी यांची भेट घेतली. उभयतांनी उभय देशातील सामरिक सहकार्याच्या मुद्द्यावर चर्चा केली, असे भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
जनरल नरवणे हे सध्या संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आखातातील महत्त्वाच्या अशा दोन देशांना लष्कर प्रमुखांची ही पहिली भेट आहे. जनरल नरवणे यांना अमिरातीच्या पायदळाच्या मुख्यालयात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यांनी शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहिले.
नरवणे यांनी बुधवारी लष्करी प्रशिक्षण संस्थांना भेट दिली होती. द्विपक्षीय सामरिक संबंध दृढ होण्यासाठी नरवणे यांच्या भेटीला महत्त्व आहे. संरक्षण आणि सुरक्षाविषयक या देशांसह असणारे संबंध त्यामुळे सुदृढ होण्यास मदत होईल, असे लष्कराने म्हटले आहे.
आखाती देशांशी इस्रायलशी असणारे संबंध सुरळीत होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातच इराणमधील अणू संशोधकाची हत्या झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नरवणे यांच्या आखाती देशातील दौऱ्याला महत्त्व आले आहे.