-->

तर सरकारकडून घरपट्टी माफ करून दाखवाच …!

मंत्री जयंत पाटलांना नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे आव्हान

इस्लामपूर (प्रतिनिधी) : एका पक्षाचे अध्यक्ष आणि राज्य मंत्रीमंडळात वजन असणाऱ्या नेत्याने इस्लामपूर शहरासाठी खास बाब म्हणून सरकारकडून घरपट्टी माफ करून आणावी. आम्ही नगरपालिकेच्या वतीने आवश्यक तो ठराव करून देऊ. असे आव्हान इस्लामपूर शहराचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता पत्रकार बैठकीत दिले.

नगराध्यक्ष दालनात झालेल्या बैठकीस नगरसेवक वैभव पवार, शकील सय्यद, अजित पाटील उपस्थित होते.  ते म्हणाले,” शहरावर राज्यात सर्वप्रथम कोरोनाचे संकट ओढवले. मुंबई-पुण्यानंतर इस्लामपूर शहरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले. गत वर्षी घरपट्टी वाढीच्या संदर्भात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांचे अपील दाखल करणे राहून गेले आहे. कायद्याच्या तरतुदीप्रमाणे 15 हजार 747 नागरिकांनी अपील दाखल केली आहेत. तर सुमारे साडेसात हजार नागरिकांचे अपील दाखल करणे राहून गेले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी सांगली यांच्या सूचनेमुळे गर्दी टाळणे आवश्यक होते. यामुळे नागरिकांना दुसरे अपील दाखल करणे शक्य झाले नाही. यात नगरपालिकेचा अथवा नागरिकांचाही दोष नाही. ही वस्तुस्थिती असताना काही पक्षांकडून शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही दुर्दैवी बाब आहे.

ते म्हणाले ,” चार डिसेंबर पर्यंत पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता व कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. या पार्श्वभूमीवर अपिलीय समिती गठीत झाली नाही. यामुळे घरपट्टी संदर्भात निर्णय घेणे शक्य झाले नाही. आता आचारसहिता संपली आहे. यामुळे 28 ते 31 डिसेंबर पर्यंत नागरिकांनी अपील दाखल करा अशा आशयाचे पत्र नगर परिषदेला प्राप्त झाले आहे.

ज्यांनी अपील दाखल केले नाहीत अशा नागरिकांनी 27 डिसेंबर पर्यंत अपील दाखल करावीत. अपील दाखल केल्याशिवाय मालमत्ताकर अपील समिती याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. शहरातील नागरिकांच्या प्रबोधनासाठी रिक्षाने आवाजी प्रबोधन केले जात आहे.”

ते म्हणाले ,’ कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणीही राजकारण करू नये. सरकारकडे दाद मागून हवे ते निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकारकडून एकही रुपयाची मदत इस्लामपूर नगरपालिकेला झालेली नाही. राष्ट्रवादी वगळता शहरातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी घरपट्टीत सवलत द्यावी अशी निवेदने दिली आहेत. या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

चुकीची बिलं दुरुस्ती करणार…

सध्या दिलेल्या घरपट्टीच्या झालेल्या बिलांमध्ये काही त्रुटी आहेत. अशा नागरिकांनी नगरपालिकेच्या दालनांमध्ये स्वतंत्र अर्ज करून द्यावा. संगणकाच्या तांत्रिक अडचणीमुळे चुकीची बिल आकारणी झाली आहे यात दुरुस्ती करून दिली जाईल असे नगराध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

उपयोगकर्ता शुल्क रद्द करून आणा..

घरपट्टी मध्ये नव्याने उपयोगकर्ता शुल्क आकारले जात आहे. वास्तविक हे शुल्क राज्यात सर्वच नगरपालिका आकारत आहेत.याबाबत विरोधकांनी राज्य शासनाकडे दाद मागावी. तसेच राज्य सरकारचा आदेश रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन नगराध्यक्ष पाटील यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.