छगन कमळ बघ… शरद गवत आण… हसन पटकन उठ; मुख्यमंत्र्यांनी घेतली विरोधकांची शाळा

विधानसभेत हास्यस्फोट

मुंबई: गणिताच्या नव्या संख्यावाचनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडनावावरून कोटी करणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांना विधानसभेत आज मुख्यमंत्र्यांनी चांगलेच फैलावर घेतले. त्यासाठी पहिलीच्या बालभारती पुस्तकातील… आई कमळ बघ, दादा कमळ बघ, छगन कमळ बघ… शरद गवत आण… हसन पटकन उठ… असे उतारे वाचून दाखवत विरोधकांना कोपरखळी मारली. मुख्यमंत्र्यांच्या या कोटीमुळे सभागृहात हास्यस्फोट झाला.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांची शाळा घेतली. शाळेतील संख्यावाचनाच्या नवीन पद्धतीवरून सध्या वादंग निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांच्या वतीने हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, एससीईआरटीने याबाबत तज्ञांची समिती नेमली होती. या समितीने मुलांच्या अध्ययन क्षमतेचा अभ्यास करून नवीन अभ्यासक्रमात बदल सुचविले. बोलायला काय सोपे पडेल? लक्षात पटकन कशा पद्धतीने राहिल? याबाबत सुधारणा सुचविल्या.

त्यात वीस अधिक दोन लिहिले आहे, पण पुढे बावीस असाही उल्लेख आहे. ही पद्धत का अवलंबिली याबाबत या तज्ज्ञांनी स्पष्ट देखील केले आहे. पण सभागृहाची जर भावना असेल तर तज्ज्ञांची समिती नेमू व समितीकडून शिफारशी मागवून त्याचा विचार करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.