योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवूया – मुख्यमंत्री

नांदेड: प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगाचे अत्यंत महत्त्व असले पाहिजे. योगाच्या माध्यमातून आपले जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

नांदेड येथे राज्य शासनाच्यावतीने तसेच विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी योगगुरु स्वामी रामदेव बाबा, खासदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार डॉ. तुषार राठोड आदींसह हजारो योग साधक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संयुक्त राष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला व हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात सर्वात कमी कालावधीत मंजूर झाला. आज जगातील 150 पेक्षा अधिक देशात सुदृढ आरोग्यासाठी योगासने केली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमास महाराष्ट्रात येण्याची विनंती बाबाजींना केली असता, त्यांनी ती तातडीने मान्य केली. त्यांना आम्ही हा कार्यक्रम मराठवाड्यातील नांदेड येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांना मोठा आनंद झाला.  मुख्यमंत्री म्हणाले, भारताची प्राचीन योग विद्या योगगुरु रामदेवबाबा यांनी संपूर्ण देशाबरोबरच ती जागतिक स्तरावरही पोहोचविली, याचा अभिमान असून आज नांदेडच्या पावनभूमीत प्रत्यक्ष रामदेवबाबा हे आपल्याला योग विद्येचे प्रशिक्षण देण्यासाठी आले आहेत. या संधीचा लाभ घेऊन नांदेड जिल्हावासियांनी निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी नियमित योगासने करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.