कोथरुड मध्ये चंद्रकांत विरूद्ध चंद्रकांत लढतीची शक्यता

आयात उमेदवाराच्या विरोधात मोट बांधण्याची तयारी

कोथरुड: कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आल्याने कोथरूड मधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपसाठी सरळ सोपी वाटणारी निवडणूक आता रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली असून इतर पक्षांचे नेते मंडळी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. चंद्रकांत पाटलांचे नाव भाजप कडून आल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी बंड करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.  त्यामुळे चंद्रकांत विरूद्ध चंद्रकांत लढत येथे पाहिला मिळू शकते.

भाजप कडून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी व नगरसेवक मुरलीधर मोहोळ हे दोघे उमेदवारीसाठी इच्छुक होते. दोघांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चांगलीच रस्सीखेच चालू होती. दोघांमध्ये अनेकवेळा वाद ही निर्माण झाले होते. मोहोळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असलेली जवळीक व कामाचा धडाका व कुलकर्णी यांनी पाच वर्षात केलेली कामे यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हा उत्कंठेचा विषय होता. भाजपसाठी सुरक्षित मतदार संघ म्हणून मागील काही दिवसांपासून पाटील यांचे नाव चर्चेत होते, पण ते अंतिम होईल असे कोणाला वाटत नव्हते. आता पाटील यांचे नाव जवळपास अंतिम करण्यात आल्याने दोघांच्या भांडणात तिसऱ्याच फायदा झाला का अशी ही चर्चा रंगू लागली आहे.

आयात उमेदवारी चा मुद्दा व युतीत कोथरुड शिवसेनेला सुटत नसल्याने मोकाटे बंड पुकारण्याचा च्या तयारीत आहेत. शिवसेना तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस अशा इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. निवडणुकीसाठी त्यांनी चाचपणी सुरू केली असून मनसे कडून ही त्यांचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. मोकाटे यांचे नाव चर्चेत येताच त्यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते व निकटवर्तीयांनी गर्दी व्हायला सुरावत झाली होती. पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे मोकाटे यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.