शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
मंचर- मंचर पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात झीरो पोलीस काम करीत असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्यामुळे शहरात गुंडगिरी वाढली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी युवासेना, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अवैध धंदे सुरू आहेत. यामुळे अनेक युवक आणि कुटुंबे व्यसनाच्या अधीन होऊन उद्धवस्त झाली आहेत. मटका, जुगार, गांजा, गुटखा, अवैध दारू विक्री, लॉजवरील बेकायदेशीर कृत्य असे अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. तसेच श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक देवस्थान असून, येथे दररोज परराज्यातून मोठ्या प्रमाणात भक्त-भाविक येतात. भाविकांच्या वाहनांना विनाकारण त्रास देऊन अडवणूक केली जात आहे.
मंचर पोलीस ठाणे येथे मोठ्या प्रमाणात झीरो पोलीस काम करतात. तसेच झीरो पोलीस हे अवैध धंदेवाले यांच्याकडून पैसे गोळा करीत आहेत. मंचर पोलीस ठाणे येथे आलेल्या तक्रारींचे निवारण करण्याचे काम बीट अंमलदाराचे आहे. परंतु, हे काम झीरो पोलीस पाहतात. मंचर परिसरातील तरुणांना स्व:ताच्या घराबाहेर रात्री बसलेले दिसल्यास नाईट राऊंडचे कर्मचारी आणि झीरो पोलीस हे शिवीगाळ व दमदाटी करुन नाहक त्रास देतात. रात्रभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवतात, असा आरोप युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख कल्पेश बाणखेले, शिवसेनेचे मंचर शहरप्रमुख संदीप जुन्नरे, भाजप युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप बाणखेले, तालुकाध्यक्ष प्रमोद बाणखेले यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे.