पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू
जुन्नर (प्रतिनिधी) : जुन्नर- नारायणगाव मार्गावरील डिंभे डाव्या कालव्यावरील पुलाला आधार देणारा दगडी पिलर गुरुवारी (दि. ३०) दुपारी ढासळला आहे. त्यामुळे ह्या पुलावरील वाहतूक तातडीने थांबविली असून मोठ्या गाड्यांची वाहतूक कारखाना-शिरोली मार्गे वळविण्यात आली आहे. आर्वी गावाच्या हद्दीतील हा पूल १९८० साली पाटबंधारे विभागाने उभारला होता. या चाळीस वर्षांपूर्वीच्या पुलाला आधार देणाऱ्या दगडी पिलरचे दगड निखळले आहेत. कुकडी आवर्तनासाठी या डिंभे डाव्या कालव्यातून ६०० क्यूसेक्स वेगाने पाणी सुरू आहे.
डिंभे धरणातून या कालव्यामार्गे येडगाव येथे पाणी जात असल्यामुळे हा विसर्ग बंद झाल्यावरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ह्या पुलाची पाहणी करता येणार आहे. दरम्यान कुकडी कालवा सल्लागार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पाणी वाटपावरून विविध तालुका प्रतिनिधींमध्ये वादविवाद झाला होता.
गुरुवारी येडगाव धरणात केवळ १३० द.ल.घ.फु. पाणी शिल्लक असून डिंभे डाव्या कालव्याचा विसर्ग थांबल्यावरच ह्या पुलाची दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. वर्दळीच्या या मार्गावर सध्या लॉकडाऊन असल्यामुळे मोजक्याच वाहनांची ये-जा सुरू आहे.