मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीला अमूल्य योगदान दिलेल्या कपूर घराण्याचा समृद्ध वारसा लाभलेला एक सदाबहार तारा आज निखळला, अशा शब्दात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
चतुरस्त्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनाच्या धक्क्यातून चित्रपटसृष्टी सावरण्याआधीच ऋषी कपूर यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयातून वेगळी छाप सोडली होती. ऋषी कपूर यांनी ७० च्या दशकात बॉबी चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केले. दामिनी, सरगम, अमर अकबर अँथोनी, कर्ज, अशा जवळपास १०० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी दमदार अभिनय साकारला.
काही दिवसांपूर्वी ऋषी कपूर कर्करोगावरावरील उपचार घेऊन भारतात परतले पण काल अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि आज त्यांच्या निधनाची दुःखद बातमी आली. ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन कपूर कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे थोरात यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे