Accident News : नातेवाईकांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून घरी परत येणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. कारण तेलंगणा राज्यातील वनेलमधील मोघाळीजवळ जीप पुलावरुन कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर या भीषण अपघातात ६ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भोकर तालुक्यातील रेणापूर येथील भालेराव कुटुंब वनेल, नवीपेठ ( जि. निजामाबाद, तेलंगणा ) येथे विटभट्टीच्या कामाला होते. हे कुटुंब भोकर शहरातील शेखफरीदनगर येथे संतोष भालेराव यांच्या मुलीच्या पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. वाढदिवस साजरा करुन रात्रीच्या वेळी स्कॉर्पिओने ११ जण परत वनेल याठिकाणी जात होते. दरम्यान, उमरी रस्त्यावरील मोघाळी शिवारातील पुलावरुन त्यांची गाडी खाली कोसळून अपघात घडला.
या अपघातात सविता शाम भालेराव (२५), रेखा परमेश्वर भालेराव (३०), अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव (३०) प्रिती परमेश्वर भालेराव (८) सर्व रा. रेणापूर, ता. भोकर आणि सुशील मारोती गायकवाड (७) रा. रामखडक ता. उमरी या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दत्ता ज्ञानेश्वर भालेराव (८), प्रितेश परमेश्वर भालेराव (८), शोहम परमेश्वर भालेराव (७), श्याम तुकाराम भालेराव (३५), ज्ञानेश्वर तुकाराम भालेराव (२८), परमेश्वर तुकाराम भालेराव (२८), श्रीकांत अरगुलवार आदी ६ जण जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमी श्याम भालेराव यांना नांदेडला अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.