शिक्रापूर पोलिसांकडून आरोपी गजाआड ः लग्नापूर्वीची मैत्री ठरली अडचणीची
शिक्रापूर – येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या एका नवविवाहितेच्या लग्नापूर्वी असलेल्या मैत्रीतून झालेल्या ओळखीमुळे लग्नापूर्वी काढलेले काही फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून विनयभंग केल्या प्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्रापूर पोलिसांनी या युवकाला अटक केली.
अब्दुल रहेमान जावेद उर्फ राजखान (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे या आरोपीचे नाव आहे. संबंधित युवतीला 2018 मध्ये तिचे वय 17 वर्षे असताना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यानंतर त्यातून राज खान या युवकाची या युवतीसोबत ओळख झाली, ओळखीनंतर दोघे दोन वेळा बाहेर फिरायला गेले. राज याने युवतीशी जास्त ओळख करून तिला दुचाकीवरून (एमएच 14 जीई 1169) रांजणगाव गणपती हद्दीतील एका लॉजवर घेऊन तिच्याशी अश्लील चाळे करत विनयभंग केला आणि यावेळी युवतीचे अश्लील फोटो देखील काढले.
त्यानंतर मे 2019 मध्ये देखील तीला चाकण येथून भोसरी रस्त्याने बळजबरीने घेऊन निघाला. युवतीने नकार दिला असताना त्याने युवतीला तिचे रांजणगाव येथे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला भोसरी परिसरातील लॉजवर घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पुन्हा तिचे फोटो काढून घेतले. ऑगस्ट 2019 मध्ये एका मुलासोबत या युवतीचा साखरपुडा झाला.
हे समजल्याने आरोपीने युवतीला धमक्या देण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर 2019मध्ये युवतीचे लग्न झाले. त्यामुळे राज खान याने तीचे काढलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर तसेच युवतीच्या नात्यातील लोकांना प्रसारित करत युवतीची बदनामी केली.