महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव विजयी : आघाडीत झाली बिघाडी?; वरिष्ठ दखल घेणार का?
नगर – महापालिकेच्या प्रभाग क्र. 6 “अ’ मधील पोटनिवडणुकीत भाजपच्या पल्लवी जाधव यांनी शिवसेनेच्या अनिता दळवी यांचा दारून पराभव केला. दोन्ही भैय्यांच्या हट्टापाई महाविकास आघाडीने जागा गमावली असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे.
शिवसेनेकडून अनिता लक्ष्मण दळवी, तर भाजपकडून पल्लवी दत्तात्रेय जाधव निवडणूक रिंगणात होत्या. यातील पल्लवी जाधव यांना 2 हजार 915 तर अनिता दळवी यांना 1 हजार 203 मते मिळाली.
नोटाने ही 119 मते घेवून गेला. डिसेंबर 2018 मध्ये महापालिकेची निवडणूक झाली होती. या प्रभागात भाजपकडे तीन तर शिवसेनेकडे एक जागा होती. प्रभाग 6-अ’मधून शिवसेनेच्या सारिका भुतकर विजयी झाल्या होत्या. मात्र, जातप्रमाणपत्र पडताळणीत विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांचा दाखला बाद ठरविला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
यामध्ये प्रभाग 6 मधील 16 केंद्रांवर मतदान झाले. प्रभागात 13 हजार 621 मतदार होते. मात्र, केवळ 31 टक्केच मतदान झाले. 4 हजार 237 मतदान वैध ठरले. या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. तर नोटानेही शंभरी पार केली. सेना-भाजपमध्ये सरळ लढत झाली. मात्र राष्ट्रवादीने महाविकास आघाडीत बिघाड केल्याने तसेच ही निवडणुक महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभागामध्ये असल्याने, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
त्यामुळे राष्ट्रवादीने भाजप मित्र पक्षाला साथ दिल्यानेचे भाजपच्या पदरात नगरसेवकपद पडले अशी चर्चा शहरात होती. मागील निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवार सारिका भुतकर यांना निवडणूकीत 3 हजार 780 मते मिळाली होती. भाजपच्या उमेदवार आरती बुगे यांना 3 हजार 307 मते तर राष्ट्रवादीच्या उमेदवार मंदा गंभिरे यांना 1 हजार 53 मते मिळाली होते. यात मतांची आकडेवारी पाहता शिवसेना व भाजपातच चुरशीची लढत झाली होती.
मात्र, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाची महाआघाडी झाल्याने राष्ट्रवादीने प्रभाग 6 अ’ मध्ये उमेदवार दिला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार निवडीसाठी महाविकासआघाडीने जोर लावला पाहिजे होता. मात्र असे न होता दोन्ही भैय्यांच्या वादात महाविकास आघाडीलाच जागा गमवावी लागली असून महापालिलेतील भाजप-राष्ट्रवादीची युती या निवडणुकीतही कायम राहिली असेही म्हणावे लागेल.
महाविकास आघाडीच्या वरिष्ठाकडून दखल घेतली जाणार का?
महापालिका निवडणूकीत सेनेचे जास्त उमेदवार निवडणून येऊन ही शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही. कारण राष्ट्रवादीने भाजप पक्षाला बहुमत दिल्याने भाजपला बहुमत नसतांनाही महापौरपद भाजपच्या पदरात पडले. तसेच आता राज्यात महाविकास आघाडी असतांना महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली. त्यामुळे महाविकास आघाडी कुठे कमी पडली याची चौकशी वरिष्ठ करणार का?