पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या करोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शहरातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार चालू आहेत. या कालावधीत इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे प्राप्त होत आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल तसेच इंजेक्शनचा काळाबाजार करणारांची गय केली जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दिला आहे.
महापालिकेच्या काही रुग्णांलयांमध्ये करोना बाधित रुग्णांवर उपचार करताना आवश्यक असणारी औषधे तसेच इंजेक्शन हे बाहेरुन आणावे लागत असल्याबाबतच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होत आहे. करोनासारख्या महामारीमध्ये शहरातील सर्व सामान्य अगोदरच धास्तावलेला आहे. अशावेळी त्यांच्याकडून महागडी औषधे व इंजेक्शन बाहेरून मागविल्यास त्यांची आर्थिक पिळवणूक होते.
महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांस बाहेरून औषधे किंवा इंजेक्शन आणण्यास सांगितल्यास त्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पार्टी कार्यालयात किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कुठल्याही नगरसदस्याकडे लेखी स्वरुपात तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केले आहे.
लेखी तक्रार दिल्यास त्यांची योग्य दखल घेण्यात येऊन औषधांचा व इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या कोणत्याही हॉस्पिटलची, मेडीकल चालकाची व डॉक्टरांची गय केली जाणार नाही. शहरामध्ये अनेक लोक करोनायोध्दे म्हणून काम करीत आहेत. परंतु काही काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींमुळे या योध्द्यांची सुध्दा बदनामी होते. ती यापुढे खपवून घेतली जाणार नाही, त्यामुळे असा काळाबाजर करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा मिसाळ यांनी दिला आहे.